Friday, October 28, 2005

मी म्हणतो ती पूर्व दिशा

बरेच दिवस मी अधून मधून विचार करायचो की आपलं इथलं घर नक्की उत्तराभिमुख आहे की दक्षिणाभिमुख! माझं ताऱ्यांचं ज्ञान अगाध असल्यामुळे (सप्तर्षि बनवायला मला आकाशातले कुठलेही सात तारे चालतात)दिशा ओळखायला मला सूर्यच जास्ती भरवश्याचा वाटतो. शेवटी काल बऱ्याच दिवसांनी सूर्य ढगांबाहेर आला आणि माझ्या लक्षात आलं की आपलं घर पूर्वाभिमुख आहे (सध्या सूर्य बराच दक्षिणेकडे असल्याने आणि मला तो भर दुपारी १२ च्या सुमारास दिसल्यामुळे हा निष्कर्ष चुकण्याचीच जास्ती शक्यता आहे). तसा माझा direction sense काही येरा-गबाळा नाही. "बबन 'अ' बिंदूपासून निघून ४ पावलं पूर्वेकडे जाऊन १३ अंशातून उत्तरेकडे वळून १९ पावले दक्षिणेला गेला तर तो आता कुठे आहे" असल्या निरुपयोगी प्रश्नांच्या ४ पर्यायांपैकी मी जो ठोकायचो तो सहसा बरोबर यायचा (आणि दर वेळी याचं कारण योगायोग कसं असेल?), त्यामुळे मी हे म्हणू शकतो. पण याचा उपयोग नेहमीच रस्ते किंवा दिशा ओळखण्यात होतो असं नाही.

विशेषतः हे पुण्यात जाणवतं. तिथे सगळे चौक हे चौक नसून छक्के आहेत (उगाच काहीतरी अर्थ काढू नका, मला असं म्हणायचंय की अशी जागा जिथे ४-४ नाही तर ६-६ रस्ते एकत्र येतात). त्यामुळे नक्की कुमठेकरांकडे जायला ३३ अंशातून वळायचं की भांडारकरांकडे जायला ५७ अंशातून, असा विचार करता करता मी बऱ्याचदा ७९.५ अंशातून वळून ढोल्या पाटलांकडे पोहोचलोय. पण पुण्यात हे सगळं चालतं, कारण की तिथले बगळे हे सांगलीतल्या बगळ्यांपेक्षाही निरुपद्रवी आहेत, तुम्ही No entry मधून उलटे आला तरी ते गोड मानून घेतात. No entry कसलं One way मधून! ("विकेटकीपर नही गोलकीपर, गोलकीपर बेवकूफ़" मोड मधे वाचणे ).

इथे बाल्टी-मोरीत मात्र सगळी तऱ्हाच वेगळी आहे. मोरीतून बाहेर पडायला २-३ फ़्री-वेज आहेत. कुठेही जायचं झालं तरी त्यापैकी १ वापरायचा. आणि मला नाही वाटत की वर दिलेलं बबन्याचं गणित इथे कोणाला सोडवता येईल. काहीही हवं असलं की लगेच ते mapquest किंवा google चा आधार घेतात. त्यांचंही बरोबर आहे म्हणा, रस्तेच इतके मोठे आहेत की स्वतःचं डोकं लावून काही झेपायचंच नाही.

मधे एकदा रात्रीच्या वेळी एका अक्राळ-विक्राळ दिसणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरने आम्हाला असंच गंडवलं. त्याला exit 12A घ्यायला सांगितलेलं असताना सुद्धा त्याने स्वतःचं नसलेलं डोकं चालवलं आणि आम्हाला अंधारात होवार्ड कौंटी फ़िरवून आणली. शेवटी अगदी आम्ही जीवावर उदार झालेलो असताना एकदाचं exit 12A दिसलं. आणि ड्रायव्हरसकट कोणालाही कळलं नाही की नक्की कुठल्या दिशेला वळल्यामुळे ते आलं. एकंदरीत काय, तर (ब्लॉगच्या) नावात काय आहे? mapquest किंवा google म्हणतं ती पूर्व दिशा!

1 comment:

borntodre@m said...

ही ही ! सही आहे राव!
आणि सांगलीतले बगळे एवढे पण निरुपद्रवी नाहीत हा, मला ब~याचदा झक्कू बसला आहे! (अर्थात मला पुणेरी बगळ्यांचा एवढा अनुभव नाही!)

पुण्यातल्या रस्तांचे एकदम झक्कास वर्णन केले आहेस हो! माझ्यासारखा माणूस जेव्हा पुण्यात (बहुतेक) असलेले डोके लावून एखादा short cut काढतो, तेव्हा ब~याचदा त्याचा "पोपट" होतो. कुमठेकरांकडे जायच्या ऐवेजी मी भांडारकरांकडे पोहोचतो!

Neways good read! Keep it Up!!